मोबाईलवर गेम आणि चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने शिस्तभंगाची कारवाई होणार.

विधान सभेत धिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना खाते गमावण्याची वेळ आली. आता कार्यालयात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या आणि चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य प्रशासनाने शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यामुळे मंत्रालयापासून विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती, वक्तशीरपणा व शिस्तपालनाविषयी सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाकडून अनेकदा वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. पण अनेक सरकारी कर्मचारी सरकारच्या या आदेशाला केराची टोपली दाखवतात.अनेक अधिकारी-कर्मचारी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता दांडी मारतात. कार्ड पंच करतात, पण कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. वारंवार रजा घेतात, नैमित्तिक रजेचे अर्जही देत नाहीत, असे प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने आता सरकारने बेशिस्त कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.