सहा वर्ष उलटल्यानंतरही रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

गडचिरोली गेल्या सहा वर्षांपासून विविध कारणांनी बांधकाम रखडल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी पुन्हा एकदा चर्चेत आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे ‘चिखल मार्गात’ रूपांतर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला जोडणारा व पुढे छत्तीसगड आणि तेलंगणाला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मागील सहा वर्षापासून खड्डेमय झाला आहे.प्रवासाकरिता अडचण निर्माण झाल्यास तात्पुरती डागडुजी करण्यात येत होती. परंतु आता या मार्गावरून वाहन तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. मागील वर्षी तर पावसामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद होता. एसटी बसेस देखील बंद होत्या. त्यामुळे सिरोंचा तालुक्याला तेलंगणामार्गे जावे लागायचे. अजूनही खाजगी वाहने त्याच मार्गे प्रवास करीत आहे. गावातून तालुका मुख्यालयी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे शक्य होत नाही.कित्येक गंभीर आजारी रुग्ण उपचाराअभावी दगावली. अपघातामुळे सहा वर्षात जवळपास पन्नासहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. इतकी भीषण परिस्थिती असतानादेखील या महामार्गाचे काम कुठे अडले या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांविरोधात विरोधात रोष व्यक्त केला आहे.